Sunday 11 June 2017

प्रवास २ राजधान्यांचा .. राजगड ते रायगड ( via सिंगापूर ) भाग 1

आज सकाळी कामानिमित्त बाहेर निघतोय ..जाताना बॅग घेतली खूप हलकी वाटतीये, कदाचित मोहिमेचा परिणाम असावा ...
      सतत भास होतोय कि डोक्यावर टोपी आहे ..पाण्यात ओला केलेला टॉवेल , हातात काठी आहे व पाठीवर जड झालेली बॅग आहे ..
    चार दिवसाची शिदोरी ,पोळी , 3 लिटर पाणी , पाण्याचा बाटल्या आणि लोणचं
     सकाळची भयंकर थंडी ,
                     तो थंडगार गारवा ,
दुपारची अंगाची लाहीलाही करणारं कडक ऊन ,
आणि रात्रीच जागरण ।।।।
                     रात्रीची तंबूत काढलेली रात्र ,
ती स्मशान शांतता .......
       नदीतील थंड पाण्यात केलेली अंघोळ , सकाळचा चहा ,राहुलने केलेली चुलीवरील मॅगी , सुरेंद्र काकांनी दिलेली हाक ( चला रे कार्यकर्त्यांनो ), मिहिरचा ओसंडून वाहणारा उत्साह व अवधूत आणलेला ( life saviours चिवडा ) आणि डेपाळलेला मी

रायगड 


 बर  असो थोडस आपल्या सह्याद्री विषयी : - 
                                                    सहयाद्रीने मला काय दिले हे विचाराल तर ..आज जे काही थोडेफार धाडसाने करतोय ती या सह्याद्रीचीच कृपा ..सह्याद्री प्रत्येकवेळी नवीन काहीतरी देतोच ..स्वावलंबन ,प्रसंगावधान ध्येय , चिकाटी ,निसर्गप्रेम असे अनेक पैलू माझ्या आयुष्याला वेळोवेळी पडले . जगणाच्या एक वेगळाच अर्थ जणू कथित करून गेला ..आम्ही आताच पायदळ घातलेल्या गुंजन मावळातील व शिवथर खोऱ्यातील क्षण , मनी साठविलेले एक एक दृश्य, जगलेला एक एक क्षण अजून सुध्दा ताजाच आहे .सर्व क्षण सर्रकन ......।।।। डोळ्यासमोरून जातायेत ..इथल्या रौद्र सौन्दर्यात, रांगडेपणात एक विलक्षण शक्ती आहे ...एकदा का तुम्ही या विश्वात सामील झालात कि परतीचे दोर आपोआपच कापले जातात ... जो कुणी येतो तो या जादुई दुनियेत रमून जातो .... # पण एक मात्र सर्वांनी नेहमी लक्षात ठेवावं आत्मविश्वास असावा साहसीपणा असावा पण आततायीपणा नको ।।आपण जिथे जातो तिथे आपल्या आठवणी शिवाय काहीही मागे ठेवू नये #
      भटकंती म्हणजे फक्त शरीराचा व्यायाम नव्हे .तर हा एक सर्वोत्तम मार्ग आहे . जेणेकरून तुम्ही आम्ही निसर्गाशी एकरूप होऊन जाऊ ..नियमित भटकणाऱ्या ना विचारलं जग कसे आहे ... सर्वांचं एक उत्तर येईल सुंदर ...
              अशीच गुंजन मावळात विसावलेला राजगड , तोरणा . एक अभेध्य सुळका लिंगाणा आणि शिवथर खोऱ्यातील स्वराज्याची आपली राजधानी रायगड .. अशी 4, 5 दिवसाची भटकंती साध घालत होती .. माझे तसे 2 हेतू होते ... एक तर 4 जून ला होणाऱ्या ( ना भूतो ना भविष्यती ) अश्या 32 मन सुवर्ण सिहांसन पुनर्र स्थापनासंकल्प सोहळा सोहळा श्री रायगडावर होणार होता ..त्या सोहळ्याचे आमंत्रण श्री राजगडाला द्यायलाच। हवे .कारण ती स्वराज्याची पहिली राजधानी .कदाचित राजगड हि रायगडाकडे डोळे लावून बसला असेल .त्यामुळे राजगड ते रायगड पायी भ्रमंती चा संकल्प केला . दुसरा हेतू असा की गेल्या काही महिन्यात सह्याद्रीच्या कुशीत विसावलो नव्हतो .त्यामुळे ती सुद्धा खल भरून काढायची होतीच..
सुरुवात 


          4 जून च्या सोहळ्याला उपस्थित राहायचे असलेने 30 तारखेला सुरुवात करणे क्रमप्राप्त होते . पण काही कारणास्तव 31 मे ला सुरुवात करायची असे ठरले . आम्ही पाठीवर बोजे घेऊन सकाळी स्वारगेट  बस स्थानकावर डेरे दाखल झालो.. कोण कुठले ५ भटके फक्त सह्याद्री प्रेमापोटी व भटकंतीच्या वेढामुळे एकत्र आले.. . सकाळी ८ ची वेल्हा लागली आणि आमचा श्री गणेशा झाला .. वैदेही ची रजा घेऊन पुढे निघालो .. ( वैदेही , राहुल , मिहीर हे माझे पुण्यातील भटके मित्र , यावेळी राहुल, मिहीर सोबत येत होते पण वैदेहिची आमच्यासोबत यायची प्रखर इच्छा असूनही जमले नाही ... नेक्स्ट time नक्की जाऊ असे सांगून निरोप घेतला) ..
          बस हळू हळू कात्रज चा घाट ओलांडून सुसाट वेगाने नसरापूर highway ला लागली.. मधेच कात्रज ते सिहंगड ट्रेक च्या आठवणी जाग्या झाल्या .. पण आता सिहंगड कधीही पाहायचा नाही हे ठरवले आहेच ..राव पर्यटन स्थळ करून टाकलाय ( गडकोट हे पर्यटन स्थळ ? कल्पना पण करवत नाही) असो ९.३० ला मार्गासनी उतरून एस.टी ला  $ जय महाराष्ट्र $ केला ... इथून डावीकडे एक वाट जाते ती राजगडा कडे .. अजून ३ मैल लांब गुंजवणे हे पायथाचे गाव .. त्यात पूर्ण डांबरी रस्ता.. वाट लागतो पायाची .. या येत्या काही दिवसात आम्हाला प्रत्येक गड जगायचं होता.. त्याचं इतिहासात रमून जायचं होतं...
गावगावत चालू असलेली मशागतीची लगभग ( चाहुल मेघ सरींची )

11 वाजता गुंजवणे गावात पोहचलो . त्याचा पायथ्याला चिकटलो न वरती पाहिलं .. बस्स्स.............आपण या सह्याद्रीचा अगंधपणापुढे किती शूद्र आहोत याची पुरती जाणीव झाली. या सह्यशिरेचा स्वामी शिवशंकर आहे . सह्याद्रीच्या गिरीशिखरावर शंभू महादेव ठाण मांडून बसला आहे.. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ,भौगोलिक जडण-घडणी मध्ये सह्यगिरीचे स्थान अलौकिक आहे.. लिहिण्यासारखं बरंच काही आहे ..पण नंतर लिहीन यावर कधीतरी
सहभागी भटके अणि मागे अभेद्द राजगड 

          आम्ही गुंजवणे हुन चोर दरवाजा वाटेवरून सुरुवात केली . मागच्या वेळी शॉर्टकट मार्गाने गेलेलो ती वाट सापडली नाही . अक्षर:श्या जंगलातून, काट्याकुट्यातून वाट काढत निघालो.. मूळ वाट डोंगरधारेवरून जाते., आम्ही मात्र डोंगराच्या बाजूने उन्हाच्या झरोळ्यातून घसरांच्या वाटेवर पोहचलो . अंगाची लाहीलाही करणारे कड़क ऊन , भरकटकेली वाट आणि नजरेत च धडकी भरणारा राजगडाचा डोलारा . सुरुवातच खडतर झालेली . सह्याद्रीने आपला कौल दाखवायला सुरुवात केलेली अजून खूप काही बाकी होत. आपला चांगलाच कस लागणार हे एव्हाना कळून चुकले . लक्ष होते पद्मावती माचीवर निघणारा चोर दरवाजा, डाव्याबाजूला प्रचंड सुवेळा माची त्यात असलेलं नैसर्गिक नेढ, समोर पद्मावती माची आणि त्यामागे असलेला अभेद्य बालेकिल्ला .. काही वेळाने पाणी पिऊन ताजेतवाने होऊन पायपीट सुरु केली . काही वेळात थोडासा चढ चढून गेलं की एक घसारा लागतो ..
राहुल राजे घसारा पर करताना टॉप स्पीड मधे 

इथून मात्र वरपर्यंत वाट दिसते ..पण इथून पुढे फक्त चढाईचा मार्ग ..पुरती दाणादाण उडते... एक लक्षात घायला हवे .हा राजगडाचा। राजमार्ग नसून चोरवाट आहे. कुठे गर्द कारवी च अरण्य तर कुठे बोडकी झाडे ..इथे एक पाण्याचे टाके आहे..
राजगाड चोर दरवाजा मार्गावर विसावा 
इथून ६० फूट वर तटबंदीमध्ये लपला आहे तो चोर दरवाजा .
 सुरेंद्र काका ( चोर दरवाजा मार्ग ) सुरक्षिततेसाठी रेलिंग 
वरपर्यंत पायऱ्या आहेत.. एका बाजूला दरी तर दुसऱ्या बाजूला उभा कातळकडा ...इथून दिसणारे दृश्य विहंगम च आहे.. आता सुरक्षिततेच्या दृष्टीने रेलिंग लावले गेलेत.. आत गेल्यावर ९० अंशात वाट डावीकडे वळते
निसर्ग सौंदर्य



चोर दरवाजा मधून जाताच ९० % वरती जाणाऱ्या पायऱ्या 






.जवळपास 10 ते 15 पायऱ्या चढून वर गेल्यावर पद्मावती तलाव लागतो .सध्या इथे पर्यटक निवासस्थान आहे पण।।।खूप गलिच्छ त्यामुळे आम्ही पद्मावती देवी मंदिरात बैठक मारली ..तिथे भेटलेल्या कचरे काकू कडून चहा घेतला. शिदोरी सोडली... वेळ फार कमी असलेने लगेच किल्ला पाहावयास गेलो. पण दुपारी ४ वाजताच भन्नाट वारा, गडद धुकं त्यामुळे सारा गड झाकोळला गेला... निदान सूर्यास्त तर पाहता येईल अशी भाबडी आशा ठेवत बालेकिल्ला गाठला.. जाता जाता राहुल ला आम्ही उद्या जिथून जाणार आहोत तो संजीवनी माचीचा मार्ग दाखवला... त्याची तिथेच तरतरलेली..कारण प्रचंड धुकं.. त्यात पुढे काहीच दिसतं नाही .जेमतेम 1 फुटाची पायवाट .. हे बघून कुणाचीही अशीच अवस्था होईल.. ज्यावेळी मी पहिल्यांदा आलेलो त्यावेळीही माझी अवस्था याहून काही वेगळी नव्हती आम्ही तर रात्री 3 वाजता पार केला होता...बालेकिल्ला फिरून ( फक्त दरवाज्याला स्पर्श करून म्हणा ना) कारण बालेकिल्ल्याचा मार्ग हि खडतर .आणि त्यात थोडा जरी अंधार पडला तर अवघड ..त्यामुळे माघारी आलो.. काही काळ सदरेजवळ बसून देवळात परत आलो... प्रचंड वाऱ्यामुळे आमचा मॅगी चा बेत बारगळला त्यामुळे घरातून आणलेलं अन्न खाऊन मंदिरातच तंबू टाकला.... बाकीचे मंदिरात असताना... सहजच बाहेर पडलो... पद्मावती मंदिराच्या मागे माचीच्या तटबंदीत नाग राजांनी दर्शन दिलं.. ( इथे साप आहेत हे कुणालाच कळून दिलं नाही ..आधीच भीती होती हे आणखी कश्याला , त्यामुळे खबरदारी म्हणून मी राहुल, मिहीर ,अवधूत बरोबर फिरलो कुणालाही अजून देखील माहिती नाही मी का त्याच्या मागे पुढे फिरत होतो, आता कळेल म्हणा)




गड सर केल्याचा आनंद 

बालेकिल्लावरील दरवाजा 

बालेकिला व्  संजीवनी माची कड़े जाणारा मार्ग 

राज सदर ( त्याचे जीर्णोंदार सुरु असलेले काम )

        राजगड पाहायला किमान ३ दिवस हवेत , एक दिवस बालेकिल्ला, एक दिवस सुवेळा माची, आणि एक दिवस संजीवनी माची असा प्लॅन केला तर राजगड किती अभेध्य आणि बेलाग आगे याचा थोडासा प्रत्यय येईल ..रात्री झोपी जायच्या आधी उद्या सकाळी उजाडलं कि निघू रे असा विनंती वजा फर्मान सोडला..
कचरे  काकू ,आजी   आमच्या मुक्कामाचे ठिकाण 


   दिवस दुसरा --  आज सकाळी पहाटे ५ वाजता उठून संजीवनी माचीवरून अळू दरवाजा ने तोरणा जवळ करण्याचा हेतू होता.. कारण तब्बल 6 तास  पायपीट करून ते साध्य होणार होत.. पण सकाळी काहीच दिसेना ... टॉर्च च्या प्रकाशात फक्त 3 ते 4 फूट दिसेल अशी चिन्हे ..त्यात काल जे काही पाहिलंय त्यामुळे ही पोर इतक्या लवकर चालायला सुरुवात करतील हे शक्यच नव्हतं... सकाळी राहुल ने मॅगी केली . घरात गॅस चा वापर करणारा आज स्टोह च्या मिणमिणत्या ज्वालेतून मॅगी बनवली , आमचा मॅगी शेफ याने या भटकंतीत , स्टोह, चूल अश्या सर्व पद्धतीने मॅगी उत्तम बनवली ..असो सकाळी बाहेर पडायला ७ चा मुहूर्त सापडला .. कचरे काकूंना बिदागी दिली ..त्याआधी देवीला साकडे घालून संकल्प सोहळ्याला यायचं निमंत्रण दिले ..
थोडीशी फोटू ग्राफी welldone राहुल 


पद्मावती मंदिर पासून संजीवनी माची पर्यंत यायला 40 मिं लागली. पण नेमका " अळू दरवाजा " सापडेना .. कुठे धुक्यात लपून बसलेला काय माहिती .. शेवटी मी , राहुल , मिहीर ने खालून तटबंदी पालथी घातली आणि सुरेंद्र काका , अवधूत ने बुरुजाच्या डावी बाजू पालथी घातली... काही वेळाने शोधलाच .. नवख्या भटक्याला सापडणे थोडे अवघडच..फोटू काढायच्या वेळी मात्र सुंदर दर्शन दिले..
आम्ही ५ भटके  आणि मगे (अळू दरवाजा ) 

गडावरील जास्त घनतेमुळे सकाळी 8 लाच कपडे  ओलेचिंब झाले.. पुढे तर घामामुळे असंख्य वेळा स्नान झालेच.. तोरण्यावर जाणारी पायवाट पूर्णपणे मळलेली आहे त्यामुळे वाट चुकण्याचा प्रश्न नाही ...एक छोटासा रॉक patch उतरून वाट मस्त गर्द वनराईतुन जाते..

मि अणि सुरेंद्र काका अणि मागे सहयाधारेवरून जाणारी मळलेली पायवाट  

मस्त वनराई ( खिंडीकडे जाणारी वाट )

                         
सुंदर रस्ता  



 तिथून पुढे वाट खिंडीत उतरते.. वाटेत मस्त करवंद हाणली.रस्तावरच काही काळ विश्रांती घेतली ... वा असा रस्ता आणि मस्त आल्हाददायक वातावरण ...अलीकडेच शासनाने वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार केलेत इति काका.. मला तर काय दिसलं नाही पण काकांना दिसला ..असो नंतर तोरणा जवळ करून उतरलो दुपारचे २ वाजलेले होते .इथून पासली फाटा अजून २ प्रहर लांब (अदमासे 6 तास लागणार )पण( देवा घाणेकर) दादाशी फ़ोन वर बोलणे झालेल त्यामुळे त्याने दिलेला सल्ला विचारात घेतला ..त्याने एक जवळची वाट सांगितली.. शेणवड गावी जाऊन मग पुढे पासली फाटा.. ती वाट शोधावीच लागणार होती.. शेवटी डोंगरधारेवरून पश्चिमेला पाहिलं गाव दिसेल तिकडे जायचं असं एकमत झाले.. पाण्याची कमतरता .. जवळपास 15 लिटर पाणी असूनही ( प्रत्येकी 3 लिटर ) आणखी खूप गरज होती.. शरीर त्याहूनही जास्त टॉक्सिक पाण्याचा स्वरूपात बाहेर फेकत होतं.. काही वेळाने उजवीकडे खाली डोंगरमाथ्याला एक गाव दिसले ..थोडा जीवात जीव आला. ओढे ,नाले, दऱ्या पार करत कसेतरी पोहचलो ..येताना पडून लोटांगण घालण्याचे ओपनिंग मीच केलं.. ओपनिंग बॅट्समन चा मान मलाच मिळाला...पोहचलो खरे पण पुरता दम निघाला , घसा पार सुकला होता आणि हृदयाचे ठोके तर ५ वा गियर टाकून फुल स्पीड ने पळत होते.. थोडेजरी over speed झाले असते तर direct यम सदनी होतोच.. गावात पोहचलो खांद्या वरची बॅग उतरवली आणि तसाच बसलो.. सर्वांची तशीच कंडिशन होती.. सर्वांची लागलीच होती. पण तरीही मिहीर ,राहुल ला गावात विहीर शोधायला पिटाळले. पण विहिरीत पाणी मात्र नव्हते..पण गुहिनी गावातील सखुबाई गुहिनी (आजींनी )बोलवून पोटच्या पोराप्रमाणे विचारपूस केली.. पाणी पाजलं.. त्या स्वतः मैलोमाईल लांबून कुठून तरी विकत पाणी आणतात
गुहिनी गावातील ( सखुबाई गुहिनी )

 मागे राजगढ़ ( लोकेशन शोधवी लागेल )

पण आम्हाला निर्मल मनाने पाणी देऊ केलं.. गावातील माणसाचं निराळी.. आजीच्या घरी जेवण करून निघालो.. इथून पूर्ण डांबरी रस्ता ..मेघ पण दाटून आलेलं.. कुठेतरी शंकेची पाल चुकचुकली पाऊस पडला तर कसला ट्रेक आणि कसलं काय।।।पन सुरेंद्र काकांनी दिलेल्या आत्मविश्वासाने सांगितलं ...( अरे चला आपल्याला निसर्ग पूर्णपणे साथ देणार अगदी रायगड ला पोहचत नाही तोपर्यंत ) ..आणि झालेही तसंच.. वाटेत कंटाळा यायचा प्रश्न नव्हता.. सुरेंद्र काकांनी केलेल्या भटकंतीचे किस्से, मी केलेल्या ट्रेक अनुभव ,राहुल मिहीर केलेल्या गमती जमती मध्ये संध्याकाळी 6 ला पासली गावात पोहचलो ..


तिथे मस्त 2-2 कप कोरा चहा घेऊन वरोती ला मिहिरच्या काकांकडे जाऊन काही सोय होते का असं ठरवून निघालो. इथून दीड मैला वर ( 4 कमी) आहे अशी माहिती मिळाली.. अजून २ तास पायपीट ..आधीच गेले १२ तास पाठीवर ओझे घेऊन फिरतोय त्यात आणखी २ तास ...पासली फाटा हुन एक रस्ता डावीकडे हरपूड, वरोटी ला जातो तर सरळ मार्ग वेल्हा ते केळद खिंडीतून भोर ला जातो ...वरोटीचा रस्ता गर्द जंगलातून जाणारा ..पूर्ण चढाईचा ..घाट रस्ता.. रात्री अनुभवलेली स्मशान शांतता आम्ही फक्त ५ भटके आजूबाजूला फक्त गर्द काळोख त्यात एक आसरा आमच्या टॉर्च चा मिन मिनाता उजेड . पण असंख्य काजव्यांनी आमचे यथासांग स्वागत केले... पाहता क्षणी सगळा दिवसभराचा क्षीण कुठल्याकुठे निघून गेला...अहा ....काय ते दृश्य वर्णावे ..माझ्याकडे शब्द च नाहीयेत.. असो वरोती गावात रात्री 9 ला पोहचलो .. गावातल्या विठठल मंदिरासमोर बसलो.. काही नाही झालं तर झोपायची जागा आहे असे ठरवून टाकले.. पण मिहिरने " शिळीमकर काकांकडे भारी सोय केली.. अगदी रात्री ९ ला अंघोळीची पण सोय झाली... त्यांचा नवीन बांधलेल्या घरात आमची सोय झाली..
विसावा 


मस्त घरी झोपतो तशी गादी , अंथरून पांघरून अशी सागरसंगीत सोय झाली.. झोपेच्या सोयीचा तसा प्रश्न नव्हताच अगदी रस्तावर पण झोपायची तयारी असते आपली ..पण  दिवस तसा सार्थकी लागला आमचं 2 दिवसाचं अंतर आम्ही एका दिवसात पूर्ण केलं.. रात्री पाठ टेकली आणि जो पाऊस चालू झाला .थांबलाच नाही .मेघ पण वाटच पाहत होते ..आम्ही सुखरूप पोचतो कधी आणि सरी कधी बरसतात कधी..

                                                                                            -----  Pranav Ajit Mangurkar


क्रमशः  भाग २ लवकरच 



सहभागी भटके --




 

















                                           








                    भटकंती करताना हे नेहमी लक्षात ठेवा  




१ ) हा ट्रेक करताना  आपल्या मुक्कामाचे ठिकाण 
आधी निश्चित  करा 
२) अंतर खुप असलेने  योग्य नियोजन करूनच निघा 
३ ) वाटेत पानी मिलाने खुप अवघड आहे। त्यामुळे पानी जपून वापरावे 
४) निसर्गाचा समतोल `राखा। 



.