" सह्याद्री " हे नावं ऐकल्यावर डोळ्यासमोर उभे ठाकतात प्रचंड बेलाग कडे ,
डोंगरवाटा , अफाट असे दुर्गम किल्ले व निसर्गाची कलाकुसर . या सह्याद्रीने त्याच्या पोटात अजाण काळातल्या
इतिहासाच्या पाऊलखुणा ,जैवविविधता अजूनही राखून ठेवल्या आहेत . . एका सुंदर तरुणीच्या घरासभोवती राखणीला पहारा चढवावा तश्याच प्रकारे हि निसर्गसंपत्ती टिकवण्यासाठी मोठमोठाले डोंगर ,दऱ्या ,नदीनाले याची शृंखला या सह्यगिरीने उभारली आहे . सह्याद्रीला जवळून ओळखायचे असेल तर त्याच्या अंगा खांद्यावर भटकायला लागतं !!!! अश्या भन्नाट रानवाटा तुडवण्यासाठी " गिरिदुर्ग " या संस्थेने बऱ्याच भटक्यांना मागच्या ६
महिन्यात सह्याद्री मध्ये खूप भटकायला भाग पाडलं . अनेक साहसी मोहिमा पार पडल्या .
अप्रतिम निसर्ग ( शैलेश दादा ) |
या वर्ष्याची भटकंतीची सुरुवात AMK ने होईल असे स्वप्नांत पण आले नव्हते . मागच्या आठवड्यात कळसुबाई वरून कुलंग ने ( इकडे कधी येतोय )अशी साध घातली होतीच . त्यातच सुबोध दादाचा msg आला ,"गिरिदुर्ग "या वर्ष्याची सुरुवात "AMK" ने करतोय. तो msg पाहिल्यावर" मनाने "केव्हाच अलंग ,मदन ,कुलंगच्या दुर्गम त्रिकुटावर भटकायला सुरुवात केली . पण काही कारणास्तव जाणे शक्य नाही असेच वाटत होते , पण अगदी ऐनवेळी निर्णय घेतला ' AMK ला काहीही करून जायचं . fc रोडवरून निघालो वाटेंत शिवाजीनगर -काळेवाडी -औंध -चिंचवड -नाशिक फाटा वरून निघालो , काही वेळातच नारायण गावात पोहचलो . मसाला दूध पिऊन संगमनेर -अकोले -राजूर मार्गे साम्रद या गावी पोहचलो . तेथील विठ्ठल मंदिरात "हरिनाम सप्ताह "चालू असलेने सकाळची काकड आरती,किर्तन चालू होती . आमच्या समूहातील दत्ता भाऊ ,सर्वेश ,जोशी काका यांनी थोडावेळ त्या किर्तनात सहभाग घेतला . आम्ही मात्र इतके गारठलो कि मंदिरातच गावकर्यांच्या घोंगडी घेऊन थंडीपासून वाचण्याचा निष्फळ प्रयत्न केला . सुबोध दादा ,नीलम ,जयेश दादा सकाळच्या नाश्त्याची सोय करायला गेले . निसर्गाच्या हाकेला ओ देऊन लगेच तयारी करून नाश्ता आटोपता घेऊन साम्रद गावातून अलंग कडे कूच केली .
ही वाट दूर जाते |
निसर्गाने त्याचे अविष्कार दाखवायला सुरुवात केली , आजोबा गडामागुन सूर्य नारायण हळूहळू आपले दर्शन देत होते . सूर्य किरणांनी सह्याद्रीच्या डोंगररांगावर त्यांची वेगळी छटा उमटवलेली . छोटे मोठे डोंगर पार करून एका पठाराजवळ आलो . जिथून " जे पाहण्यासाठी इथे आलो आहोत त्याची एक झलक दिसली" त्याचे वर्णन करण्यासाठी शब्द नाहीयेत माझ्याकडे .
तिथून छोट्या नळीच्या वाटेनी दगडामधून वाट काढत वरती पोहचलो . आम्ही २३ भटक्यांनी अलंग गडाच्या दिशेने कूच केली . इथे मात्र बऱ्याच जणांनी मान टाकली , चाल चांगलीच मंदावली . दुपारी १ च्या दरम्यान अलंग च्या खालच्या गुहेत सर्वानी पाठीवरील बॅग खाली टाकल्या . तिथेच खाली पडी टाकली . कोण कुठली भल्या घरची पोरं या २ दिवसात जे मिळेल खातील ,कुठे जागा मिळेल तिथे पडी टाकतील ,जे समोर येईल त्याचा सामना करतील मग कितीही प्रतिकूल परिस्तिथी येवो .हेच सह्याद्री आजवर शिकवत आलाय . काही वेळाने बजरंग (वाटाड्या ) जेवण घेऊन आला . पोळी बटाट्याची भाजी यावर यथेच्य ताव मारून अलंग चा फेरफटक्यासाठी तयार झालो . गोऱ्या लोंकानी महाराष्ट्रातील बऱ्याच किल्ल्यांची तोडफोड तर केलीच त्यासोबत गडावर जाणाऱ्या पायऱ्या पण उध्वस्त करून टाकल्या . हे या ३ गडावर याचा प्रत्यय येतो . यामुळेच हा ट्रेक इतका भन्नाट ,भयानक , थरारक झालेला आहे . वरती गडावर पाहण्यासारखे १० टाकी आणि एक पडका वाडा . टाक्यांचं वैशिष्ट्य खूपच भारी आहे . एक टाक भरले कि दुसरे टाके . एक पाणी साठवणीचे उत्कृष्ट नियोजन अलंग गडावर पाहायला मिळेल .
पाण्याचे टाके |
अलंग गडावरून खाली आलो सर्वानी पाठीवर बॅग घेतल्या . Now Way Toward "Madan fort". तिथून ५ एक मिनिटात अलंग च्या सुप्रसिद्ध rockpatch जवळ आलो . तिथे पोचलो त्यावेळी ५
वाजत आले होते . इथून पुढचा ट्रेक सर्वांचीच परीक्षा पाहणारा ठरणार होता . पण त्या rockpatch आधी छोटेखानी तिरप्या पायऱ्या होत्या . त्याच्या उजव्या हाताला उभा कातळ आणि डाव्या हाताला खोलवर दरी त्यात आणखीनच भर थंडगार झोंबणारा वारा ,त्या वाऱ्यामुळे सर्वांचे पाय थंडीने कापत होते .खालचा तळ देखील दिसत नाहीये जिकडे पाहाल तिकडे खोल दरी . आम्हाला rapelling करून खाली उतरायचे असल्याने फारसे कठीण नव्हते पन झोंबणारा वारा त्याला आणखी कठीण करत होता . सर्वानी हार्नेस बांधून खाली उतरण्याची तयारी दर्शवली .
अंधार होतं आला होता त्यामुळे सर्वाना सुखरूप खाली घेऊन येणे गरजेचे होते . सुबोध दादा सर्वांना motivate करत सर्वांना खाली आणत होता . आम्ही लागलीच ८ जण पुढील मार्गाला लागलो . मदन च्या rockpatch पर्यंत पोचायला २ तास तर नक्की लागणार होते . त्यात काही मित्रांकडे टॉर्च नसल्याने चंद्राच्या प्रकाशात जसे दिसेल तसे जायचे होते . इथला मार्ग तास आहे सोपा पण अंधारात नीटसे दिसत नसल्याने त्याचा थरार खूपच वाढला होता . त्यात दिवसभरात झालेली तंगडतोड . काही वेळाने मदन च्या सुरुवातीच्या अरुंद पायऱ्या आल्या . इथून एक एक पाऊल टाकत जावं लागणार होतं . थोडा जरी हलगर्जीपणा केला तर कडेलोट होणार याची पूर्ण खात्री होती . त्यामुळे स्वतःचा तोल सांभाळत मजल दरमजल करत मदन च्या २५ फूट rockpatch जवळ येऊन बसलो . आमचा वाटाड्या आल्याशिवाय इथून पुढे जाण कदापी शक्य नव्हते त्यामुळे तिथे थंडीत कुडकुडत बसण्याखेरीज काहीही पर्याय नव्हता . थंडी अनुभवायची असेल तर इथेच यायला पाहिजे . काही वेळाने वाटाड्या आला . पुढे असे काही होईल हे विचारात देखील नव्हते . वाटाड्या ला तब्बल १५ मि लागले वरती चढायला फक्त . यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता पुढे काय थरथराट होता . खाली सरळसोट दरी . त्यात काळोख सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरले होते . पहिला मलाच चढायचे असल्याने भीती तर प्रचंड होती . हातपाय आधीच थरथर कापत होते . दोर लावला होता पण . पाय रोवायला काहीच दिसत नव्हते . याआधी कधीच इतका घाबरलो नसेन तितका या rockpatch ने चढायच्या सुरुवातीला घाबरून टाकला . संतोष ( वाटाड्या ) ने सांगितलं मी तुला वरती ओढून घेईन पण ते तेवढे सोपे नव्हते . खालून वरती ओढायचे तेपण बॅगसकट . त्यात आणखी भर घातली हात तर भट्टीत भाजल्यासारखे गरम झाले होते . त्यामुळे माझ्या होल्ड च्या दोर वर हात सटकत होते . खालून टॉर्च मारून फारसा फरक पडत नव्हता . कसेतरी निम्मे अंतर पार करून गेलो . मला इतक्या रात्री प्रचंड घाम फुटला होता . rockpatch च्या मध्यावर मी आपल्याकडून हे होणे शक्यच नाही . मी पूर्णपणे शरणागती पत्करली होती . संतोष चा होल्ड पण सुटतं होता . माझी हि अवस्था बघून वरती आलेले पुन्हा ४ पायऱ्या खाली उतरून गेले . मी जवळजवळ ५ एक मि त्या दोरीला धरून काढली . होती नव्हती ती हिम्मत एकत्र करून जमेल तसे होल्ड पकडत वरती धापा टाकत पोहचलो . आमचा वाटाड्या ही घामाने निथळला होता . माझ्यानंतर जोशी काका वरती आले . त्यांनाही माझ्याप्रमाणेच यायचं होतं . त्यांचाही माझ्यासारखीच अवस्था होती . त्यांना वरती ओढताना चांगलीच शक्ती लागत होती . तितक्यात सुबोध दादा patch जवळ आला आणि त्याने दोरीला नॉट बांधायला सांगितलं . त्यामुळे आता बाकीच्यांना चांगला होल्ड मिळणार होता . त्यांचे काम खूपच हलके झाले . दत्ता भाऊ ,नीलम वरती आल्यावर आम्ही गडावर च्या गुहेकडे प्रस्थान केलं आणि रात्री ९.४५ ला गुहेत पडी टाकली . आमचा लास्ट ट्रेकर वरती यायला जवळजवळ १२ वाजून गेले होते . त्या रात्री तो patch चढून त्या तुटलेल्या पायऱ्या अश्या अंधाऱ्या रात्री सर्वजण वरती आले . हेच "गिरिदुर्ग "चे खऱ्या अर्थाने यश होते .
मदन उतरून कुलंग कडे कूच
सकाळी ६ ला उठून पुन्हा आवराआवर ,नाश्ता करून बाहेर पडलो . आता ठरवले होते . काल जे अनुभवला त्यावर मात करून पुढे जायचं . त्याप्रमाणे मी ,जोशी काका ,राहुल ,मिहीर ,दत्ता भाऊ , महेश दादा आम्ही पुढे निघालो . rapelling अगदी निवांत केलं . काल तो patch चढायला १५ मि लागले त्यासाठी आज माझ्यासाठी १५ sec इतका वेळ पुरेसा होता . माझ्यानंतर मोनिका , सायली ने हि न घाबरता तो patch पार केला . आमच्या सोबत ३ असे भटके होते त्यांनी त्यांचा पहिला वहिला ट्रेक "AMK " करत होते . त्यांचं कौतिक करावं तितका थोडं आहे . अर्रर्रर्र थोडा भरकटलो पण असो आम्हाला तसे जिवाभावाचे सोबती मिळाले होते , आम्ही फक्त काही तासांपूर्वी भेटलो तरीपण सर्वजण एकमेंकाची काळजी घेत मार्गक्रमण करत होते . याच समाधान काही औरच . असे बरेच मित्र मला या सह्याद्रीने देऊ केले .
आम्ही ५ जण मदन च्या पायऱ्या उतरून अलंग आणि मदन च्या मधील खिंड गाठली . येऊन उजवीकडे मदन आणि डावीकडे कुलंग चा भला मोठा ट्रॅव्हर्स . ची वाट धरली . डावीकडे खोल दरी आणि उजवीकडे उभा कंटाळा मागे ठेवत आम्ही घसारा पार करीत मदन आणि कुलंग च्या खिंडीत पोहचलो . उजवीकडे वळून कुलंग कडे कूच केली . कुलंग समोर नजरेच्या टप्प्यात दिसतोय पण अजून २ तास तंगडतोड करून मग पायऱ्या आल्या . आमच्या मागे कुणीच येत नव्हते त्यामुळे बराच वेळ थांबावे लागले . . काही वेळाने
काही भटके दिसले आणि आम्ही जाऊन थांबलो ते थेट कुलंगच्या पायऱ्या जिथून सुरु होतात तिथे . आम्ही दीड दिवसात अलंग पाहून मदन चढून उतरून पुन्हा कुलंग सर केला होता . धापा टाकत पायऱ्या चढलो कातळात कोरून काढलेल्या गुहेत दाखल झालो . तिथे बॅग टाकून कुलंग चा बघण्यासारखे एकमेव ठिकाण .. कातळात गडाच्या सर्वोच माथावर कोरलेलं पाण्याचं टाक . तिथे जाऊन पाणी भरून त्या थंडगार अमृततुल्य पाण्याजवळ झोपून १ तास विश्रांती घेतली . येताना कुणीही मोबाईल व कॅमेरा पाण्याच्या टाक्याजवळ घेऊन आलेले नव्हते . त्यामुळे . निदान मोबाईल घेऊन येऊ फोटो काढू असे एकमत झाले . गुहेत जाऊन थोडेसे हलके फुलक खाद्य घेऊन मी ,राहुल,मिहीर ,सिद्धांत ,विजय ,दत्ता भाऊ ,महेश पठारावर जाऊन पोचलो , तिथून मदन आणि अलंग ,मागे कळसुबाई आपले अस्तिव दाखवत होते . तिथून जे काही पाहायला मिळालं ते अवर्णनीय होतं . उद्या आमच्या फेसबुक च्या कव्हर फोटो साठी काही अप्रतिम snaps मिळाले होते .
पाण्याचं टाक कुलंग गड |
at टॉप कुलंग गड |
आम्ही जेवण करून लगेचच गड उतरायला घेतला होता . येताना बाकी सर्व पुढे . माज्यासोबत सायली होती . तिने विनंती वजा आदेश सोडला मला बस पर्यंत खाली घेऊन जायची जबाबदारी तुझी . तिला घेऊन निघालो .. मी ,सायली ,मंदार अशे ३ जण सावकाश खाली उतरत गडाच्या पायऱ्या उतरून खाली आलो . तिथून पुन्हा रात्रीच्या अंधारात तो घसरडे टप्पे पार करत खाली पठारावर आलो . खाली आल्यावर सर्वानी मागे वळून "AMK " चे सौदर्य डोळ्यात साठवून घेतला . सायलीला तर इतका आनंद झाला होता कि तिचं नाचायचं फक्त शिल्लक होत .
या २ दिवसात बरेच काही शिकलो होतो ,बरच काही मिळवलं होतं . सह्याद्रीच एक नवीन बेलाग रूप , अलंग च्या गुहा , मदन चा rockpatch ( मदन चा patch तर खूप काही शिकवून गेला ,तो कधीच विसररू शकणार नाही ) , आम्ही २३ भटके आणि नव्याने झालेली ओळख ,कुलंग वरील पाण्याच्या टाक्या , सुबोध दादाने दिलेली घोषणा (त्या कडेकपारीत घुमलेला तो आवाज , शैलेश दादाचे फोटो चे नेपुण्य , राहुल ने तर कमाल केली त्याने ज्या काठीच्या साह्याने तो गड चढला उतारला ती काठी तो एक आठवण म्हणून पुण्यात घेऊन आला , सायली चा खाली उतरल्यानतर चा आनंद ,
गिरिदुर्ग ( सामर्थ्य सह्याद्रीचे ) हे ब्रिद वाक्यं खरंच साध्य केलय
छायाचित्र - शैलेश पदाळकर
गिरिदुर्ग टीम - सुबोध वैशंपायन ,जयेश सिकची , वैदेही नेने ,धनश्री जोशी ,नीलम शिंदे ,कोमल माहेश्वरी
सहभागीं भटके - जोशी काका , राहुल नेने , मिहीर मोरे , सिद्धांत काशीद , दत्ता भाऊ , विजय साळुंखे ,
ओंकार किंकर , मंदार मुथाळ ,सायली दळवी , सर्वेश बजाज , मोनिका , प्रकाश ,
महेश पवार ,दीपक ,राहुल , मी ( प्रणव मांगुरकर ),सुरज ,अनिल गिरी ,रोहित
विनम्र सूचना --
कुठेही जाताना योग्य ती काळजी घ्या
रात्री ट्रेक ला जाणे शक्यतो टाळावे ... आमचा नाईलाज होता
टॉर्च सोबत ठेवावी
निसर्गाचा समतोल राखा